संगमनेरमधील ऑसिड हल्ल्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद; विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, मुलीच्या उपचारांचा खर्च शासन उचलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आहिल्या नगर जिह्यातील संगमनेर येथे सहावीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगताना विरोधी सदस्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. पीडित मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे आहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

विजय वड्डेटीवार यांनी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला. राज्यात महिला आणि लहान बालिकांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसून संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर झालेला अ‍ॅसिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. राज्यात मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आहिल्या नगर जिह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून तेथील पोलीस अधीक्षकांवरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली जर असुरक्षित असतील तर ती राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले. अधिवेशन सुरू असताना अशी घटना घडणे हे गृहविभाग व सरकारचे अपयश आहे. अकरा वर्षांच्या मुलीचा चेहरा गंभीररीत्या भाजला असून तिच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून पुढे प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. त्यामुळे मुंबईतील मोठ्या रुग्णालयात उपचार करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

गावातील तरुणावर संशय

विखे-पाटील यांनी सभागृहात घटनेची माहिती देताना घटनाक्रम सांगितला. अ‍ॅसिड फेडणारा तरुण वडगावपान गावातीलच असावा, मुलीवर सध्या प्रवरा मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या उपचारांचा शंभर टक्के खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची माहितीही विखे-पाटील यांनी दिली.