
आयटी शेअर्समधील तेजीने बुधवारी शेअर बाजार सावरला. इन्फोसिसच्या नेतृत्वाखाली आयटी शेअर्स वधारले. त्याचबरोबर भारती एअरटेल, एल अॅण्ड टी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीने बाजाराला अतिरिक्त आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती घसरल्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला, मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण बाजारासाठी नकारात्मक घटक ठरली.
बीएसई सेन्सेक्स बुधवारी 76,367 वर मजबुतीने उघडला. व्यवहाराच्या दरम्यान तो 77,000 अंकांपर्यंत चढला होता. अखेरीस 633.29 अंक म्हणजेच 0.83 टक्क्यांची वाढ नोंदवत तो 76,704.13 वर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी-दिवसभरात 196.65 अंक म्हणजे 0.83 टक्क्यांच्या वाढीसह 23,777.80 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांची संपत्ती 5.51 लाख कोटींनी वाढली
बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन वाढून 438.81 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहाराच्या दिवशी हे मार्केट कॅप 433.30 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आज एकाच दिवसात बीएसईवरील कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 5.51 लाख कोटी रुपयांनी वाढले.






























































