शेअर बाजारात भूकंप, एका दिवसात 13 लाख कोटी रुपये बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धाचा आज सर्वात मोठा फटका शेअर बाजाराला बसला. कतारच्या वायू साठय़ांवर हल्ले करण्यात आल्यामुळे शेअर बाजारात भूकंप आला. सेन्सेक्स 2,497 अंकांनी कोसळून 74,207 वर तर, निफ्टी 776 अंकांनी कोसळून 23,002 अंकांवर बंद झाला. ही गेल्या 22 महिन्यांमधील सर्वात मोठी घसरण होती. एप्रिल 2025नंतर प्रथमच सेन्सेक्स 75 हजारांखाली गेला आहे. शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात तब्बल 13 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून सेन्सेक्समधील गुंतवणूकदारांचे जवळपास 37 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

इस्रायलने इराणच्या पार्स वायू क्षेत्रावर मोठा हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारच्या रास लाफान येथील मुख्य वायू साठ्यांवर हल्ला केला. याशिवाय सौदी अरबमधील यानबू येथील सामरेफ या मोठ्या रिफायनरीवरही ड्रोनने हल्ला केला. तसेच कुवेतमधील तेल क्षेत्रांवरही इराणने मोठे हल्ले केले. या हल्ल्यांमुळे जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाचे दर 115 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत वाढले. याचा मोठा परिणाम अमेरिकेसह आशियातील शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्समध्ये जून 2024 नंतरची आज सर्वात मोठी घसरण झाली. 4 जून रोजी सेन्सेक्स 5.74 टक्क्यांनी कोसळले होते. त्यावेळी एनडीए सरकारला मोठे बहुमत मिळणार नसल्याच्या अंदाजामुळे सेन्सेक्स 4,300 अंकांनी कोसळला होता.

एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा बँकेपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेनेदेखील गुंतवणूकदारांना मोठा हादरा दिला. बँकेचे हंगामी अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिला. त्यामुळे आज बँकेचा शेअर 5.11 टक्क्यांनी कोसळला. बँकेतील काही घटना आणि कार्यपद्धती वैयक्तिक मूल्य आणि नैतिकतेला धरून नसल्याचे चक्रवर्ती यांनी राजीनाम्यात म्हटले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणखी घबराट पसरली आणि मोठय़ा प्रमाणात शेअर्सची विक्री झाली. बँकेचा शेअर कोसळल्यामुळे एक लाख कोटी रुपयांचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. बँकेने चक्रवर्ती यांच्या जागेवर केकी मिस्त्राr यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुकती तीन महिन्यांसाठी असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

सोने-चांदीच्या दरातही घसरण

युद्धामुळे सोने आणि चांदीची झळाळी कमी झाली आहे. इंडियन बुलियन व ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या दरांनुसार, एक किलो चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आठ हजार रुपयांनी कोसळली. चांदीचा भाव प्रतिकिलो 2.30 लाख रुपये, तर 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.48 लाख रुपयांवर आला आहे. इराण युद्धामुळे गेल्या पाच दिवसांत सोने 13 हजार, तर चांदी 38 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

युद्धामुळे 38 लाख कोटींचा फटका

शेअर बाजारात या आठवडय़ात सलग तीन दिवस तेजी होती, मात्र, आज बाजाराने गटांगळी खाल्ली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल बुधवारी 438 लाख कोटी रुपये एवढे होते. आज ते घसरून 425 लाख कोटी रुपयांवर आले. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे जवळपास 13 लाख कोटी रुपये बुडाले. 27 फेब्रुवारीला कंपन्यांचे बाजार भांडवल 463 लाख कोटी रुपये एवढे होते. युद्ध सुरू झाल्यानंतर त्यात जवळपास 38 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.