अशोक खरातकडे तीनशे कोटींची मालमत्ता; झडतीसत्रात पिस्तूल, कागदपत्रे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला राजकीय ज्योतिषी अशोककुमार खरात याचे घर, फार्म हाऊस व कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली. बाजारभावानुसार सुमारे तीनशे कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे, पिस्तूल आणि अन्य आक्षेपार्ह पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. अजून तीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे.

अंकशास्त्र्ा आणि विश्वशास्त्र्ााचा अभ्यासक असलेला ज्योतिषी अशोक खरात याने गुंगीचे औषध दिले, संमोहन करून बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दिल्यावरून खरात कालपासून पोलीस कोठडीत आहे. नाशिकच्या कर्मयोगीनगर येथील आलिशान बंगला, पॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील फार्म हाऊस येथे पोलिसांनी झडतीसत्र राबविले. शहरातील पाथर्डी भागात तीस एकर, तर ओझर परिसरातही काही जमीन असल्याचे समोर आले. चालू बाजारभावानुसार ही मालमत्ता सुमारे तीनशे कोटींची आहे. पाच कोटींचा बंगला असून, एक कोटीचे कार्यालय आहे. मिरगाव येथील 45 एकर जमिनीची पिंमत सुमारे दहा कोटींच्या पुढे आहे. फार्म हाऊसवर एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिह्यात कोपरगाव आणि शिर्डी परिसरातही त्याची मालमत्ता असून, शोध घेतला जात आहे. ज्योतिषी व्यवसाय, राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधातून अवघ्या पंधरा वर्षात त्याने ही माया जमा केली आहे.

आणखी गुन्हे दाखल होणार

अत्याचारित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सत्ताधाऱयांशी असलेल्या राजकीय हितसंबंधाचा दबाव टाकल्याने तक्रार दाखल होत नव्हती, आता महिलांवरील अत्याचाराचे आणखी तीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

चाकणकरांना बडतर्फ करा

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भोंदू खरातच्या पाद्यपूजनाचे निंदनीय कृत्य केले आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

कॅप्टन ते राजकीय ज्योतिषी

मर्चंट नेव्हीमध्ये बावीस वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या अशोक खरातला कॅप्टन खरात म्हणून ओळख मिळाली. नेव्हीत असतानाच त्याचा विश्वशास्त्र्ााचा अभ्यास होता. अंकशास्त्र्ााचाही त्याने अभ्यास केला. वीस वर्षांपूर्वी नाशिकच्या पॅनडा कॉर्नर भागात ओकस प्रॉपर्टीच्या आडून त्याने ज्योतिषी व्यवसाय सुरू केला. हळूहळू तो प्रसिद्धीस आला. राजकीय नेते, अधिकारी यांच्या अर्थसहाय्याने त्याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे सन 2009 मध्ये नदीच्या ईशान्य बाजूला श्री ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केली. शिवनिका संस्थान नावाने ट्रस्ट स्थापन केला. दोन वर्षांपूर्वी शिवनिका ट्रस्टमध्ये बदल करून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा ट्रस्टींमध्ये समावेश करण्यात आला. शिर्डी दौऱयावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ईशान्येश्वर मंदिरात जाऊन खरातच्या उपस्थितीत पूजाअर्चा केली. तेव्हापासून राजकीय ज्योतिषी म्हणून त्याचा बोलबाला वाढला. मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री दीपक केसरकर, सुनील तटकरे हेही त्याचे भक्त असल्याचे समोर आले आहे.