रुपाली चाकणकरांवर प्रश्न विचारताच सुनील तटकरे भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याला महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अशोक खरात याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असलेल्या अशोक खरात याच्या कारनाम्यांमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून सध्या विरोधकांकडून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी महाडमधील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर माध्यमांनी सुनील तटकरेंना अशोक खरात प्रकरणावरुन रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारला. यावर सुनील तटकरे चांगलेच भडकले. ही जागा बोलायची नाही. मी योग्यवेळी बोलेन. मला घटनेने आधिकार दिला आहे, मला ज्यावेळी बोलायचं आहे, त्यावेळी बोलेन, असं सांगत सुनील तटकरे तिथून थेट निघून गेले

खरात आणि चाकणकरांची वृत्तपत्राच्या मालकांना धमकी

एक वर्षापूर्वी एका स्थानिक वृत्तपत्रात, ‘कॅप्टन भोंदूबाबा’ या मथळ्याखाली अशोक खरात याच्या कारनाम्यांबाबत वृत्त छापून आले होते. त्यावेळी खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीदेखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे.

रुपाली चाकणकरांना नारळ?

कॅप्टन खरात याच्या काही कारनाम्यांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे दिसून येत आहे. ‘कॅप्टन भोंदूबाबा’चे कारनामे वर्तमानपत्रांतून उघड करणाऱया संपादकांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फोन करून धमकावले. एवढेच नाही तर खरात याच्याशी संबंधित ट्रस्टवरदेखील त्या आहेत. चाकणकर यांना पदावरून हटविण्याची मागणी जोर धरू लागली असून चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून गच्छंती अटळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकणकर यांना कधी नारळ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.