
लग्नानंतर पत्नीने स्वयंपाक न करणे, घरातील काम व्यवस्थित न करणे यासारखी कारणे सांगून याला क्रूरता मानले जाऊ शकत नाही. तुम्ही मोलकरणीशी नाही तर जीवनसाथीसोबत लग्न केले आहे. त्यामुळे घरातील कामे करणे हे पत्नीप्रमाणे पतीचीही जबाबदारी आहे, अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायाधीश संदीप मेहता आणि न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर एका घटस्पह्ट प्रकरणात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
आधीच्यासारखा काळ आता राहिला नाही. पत्नीसोबत पतीचीसुद्धा घरातील कामे करण्याची जबाबदारी आहे. आजचा असा काळ आहे, पत्नीप्रमाणे पतीनेसुद्धा स्वयंपाक करावा आणि घरातील कामे करावीत. पत्नी ही जीवनसाथी आहे. त्यामुळे दोघांनीही मिळून घरातील कामे करणे आवश्यक आहे. खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. परंतु अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. आता पुढील सुनावणीला पत्नी आणि पत्नी या दोघांनाही वैयक्तिकरीत्या हजर राहण्यास कोर्टाने सांगितले आहे. पती-पत्नीचे 2017 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक 8 वर्षांचा मुलगासुद्धा आहे. पती सरकारी शाळेत शिक्षक आहे. तर पत्नी प्राध्यापक आहे.
उच्च न्यायालयाचा निकाल पत्नीच्या बाजूने
कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका मान्य करत क्रूरतेच्या आधारावर पतीला पत्नीपासून घटस्पह्ट दिला. पत्नीने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करत घटस्फोटाचा निर्णय फेटाळून लावला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नाराज झालेल्या पतीने अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्ट आता अंतिम सुनावणी करताना यावर निर्णय देणार आहे.

























































