
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध शनिवारी आणखी धोक्याच्या वळणावर पोहोचले. इराणने अमेरिका व ब्रिटनच्या वर्मावरच घाव घातला. हिंद महासागरात असलेल्या दिएगो गार्सिया बेटावर इराणने तब्बल चार हजार किलोमीटरवरून क्षेपणास्त्र डागली. यातील एक क्षेपणास्त्र अमेरिकेने कसेबसे रोखले, तर दुसरे रस्त्यात पडले. हा वार निशाण्यावर लागला नसला तरी इराणने या हल्ल्यातून ताकदीची चुणूक दाखवून दिली. त्यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे.
आम्ही विजयाच्या अगदी निकट आहोत, अशी दर्पोक्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असतानाच इराणने हा हल्ला चढवला. ‘खुर्रमशहर-4’ श्रेणीच्या अण्वस्त्र्ावाहू क्षमता असलेल्या क्षेपणास्त्र्ााच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला. ‘खुर्रमशहर-4’ या क्षेपणास्त्र्ााची मारक क्षमता चार हजार किमी एवढी आहे.
इराणच्या या लांब पल्ल्याच्या हल्ल्याने अमेरिका, ब्रिटनसह नाटो राष्ट्रांना चिंतेत टाकले. इराणच्या ‘खुर्रमशहर – 4’ क्षेपणास्त्र्ााच्या टप्प्यात पॅरिस, लंडन या शहरांसह युरोपातील अनेक महत्त्वाची शहरेही आली आहेत. ‘खुर्रमशहर-4’ क्षेपणास्त्रात तरल इंधनाचा वापर करण्यात येतो. हे क्षेपणास्त्र्ा एक टन वजनाचे अण्वस्त्र्ा वाहून नेऊ शकते. त्यासोबतच या क्षेपणास्त्र्ाात एकाच वेळी अनेक निशाण्यांवर अर्थात ‘क्लस्टर’ हल्ला करण्याचीही क्षमता आहे. याशिवाय हवेतच दिशा बदलण्याचे सामर्थ्य असल्यामुळे त्याला रोखणे कठीण समजले जाते.
गार्सिया बेटाचे सामरिक महत्त्व
दिएगो गार्सिया बेटावर अमेरिका आणि ब्रिटनची संयुक्त मालकी आहे. हिंद महासागरात चागोस द्वीपसमूहात वसलेले हे बेट सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे आहे. अफगाणिस्तान आणि इराकवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने याच बेटाचा वापर केला होता. या बेटावरील विमानतळ भयंकर हल्ल्याचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. अमेरिकेने या ठिकाणी अत्यंत संहारक शस्त्र्ााचा साठा ठेवला आहे. या बेटावरच अमेरिकेच्या युद्धनौकाही तैनात असतात.
लवकरच लक्ष्य साध्य करू – ट्रम्प
युद्ध थांबवण्याचे संकेत देतानाच ट्रम्प यांनी बदला घेण्याची धमकीही दिली. ‘इराणची मिसाईल क्षमता संपवणे, नौदल व हवाई दल नष्ट करणे, संरक्षण सामुग्रीची उत्पादने बंद पाडणे, इराण अण्वस्त्रसंपन्न होण्याच्या जवळपासही जाणार नाही याची तजवीज करणे ही आमची उद्दिष्टे आहेत. ती लवकरच साध्य करू,’ असे ट्रम्प म्हणाले.
होर्मुझच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही!
‘होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेची नाही. ज्या देशांना याचा वापर करावा लागतो, त्यांनीच आता ती जबाबदारी घ्यावी. गरज भासल्यास अमेरिका मदत करेल, मात्र तोपर्यंत इराणची ताकद आम्ही संपवलेली असेल,’ असे ट्रम्प म्हणाले.
इराणी तेलाचा मार्ग मोकळा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुरते गोंधळून गेले आहेत. ज्या देशाशी युद्ध सुरू आहे, त्या इराणच्या तेलावरील निर्बंध ट्रम्प सरकारने उठवले आहेत. युद्धामुळे निर्माण झालेला इंधन तुटवडा आणि उसळलेले तेलाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे ट्रम्प प्रशासनाने सांगितले. या निर्णयामुळे समुद्रात अडकलेले सुमारे 140 दशलक्ष बॅरल इराणी तेल विक्रीसाठी खुले होणार आहे. हे तेल विकण्याची परवानगी इराणला मिळाली आहे. ही सवलत 19 एप्रिल 2026 पर्यंत राहणार आहे. इराणला खूष करण्याचा हा प्रयत्न नसून जगातील तेलाचा पुरवठा सुरळीत करणे हा आमचा उद्देश आहे, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी स्पष्ट केले. याआधी ट्रम्प यांनी रशियन तेलावरील निर्बंधही उठवले आहेत.
शत्रूला धूळ चारली; मोजतबा खामेनी यांचा दावा
पारसी न्यू इयर नवरोजचे औचित्य साधून इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी देशाला उद्देशून संदेश दिला. ‘इराणने अमेरिका व इस्रायल या शत्रूंचा पराभव केला आहे. सर्वोच्च नेते व कमांडरना मारून इराण सरकार उलथवता येईल अशा भ्रमात शत्रू होता, पण त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत,’ असे खामेनी म्हणाले.

























































