
एलपीजी गॅसचा तुटवडा कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्वयंपाक गॅसचे अधिक समतोल वितरण करण्यासाठी तेल विपणन कंपन्या (OMCs) कमी वजनाचे सिलिंडर देण्याचा पर्याय विचारात घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरमध्ये कमी गॅस भरून वितरण करण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने या संदर्भातील बातम्यांना फेटाळून लावत अशा प्रकारच्या चर्चांना “फक्त अंदाजांवर आधारित” आणि अफवा असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयातील संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, अशा कोणत्याही अंदाजांवर भाष्य करता येणार नाही आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी मात्र अशा प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे मान्य केले आहे. “हा प्रस्ताव नक्कीच विचाराधीन आहे, मात्र अंतिम निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल,” असे एका सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या रिफिल बुकिंगमध्ये काहीशी घट होऊन ती जवळपास 50 लाखांवर आली असल्याची माहिती देत मंत्रालयाने पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गॅस वितरणात कोणतीही अडचण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



























































