
पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या वादातून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या रागातून इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध केले. याप्रकरणी 31 वर्षीय रेल्वे इंजिनीअरवर दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2), 352, 356 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम 66C, 66E आणि 67A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मूळची राजस्थानची असलेल्या पीडितेचा 25 नोव्हेंबर 2020 रोजी आरोपीसोबत विवाह झाला. सध्या ती मालाड (पूर्व) येथे पतीसोबत राहून युपीएससी परीक्षेची तयारी करत होती. तर तिचा पती पश्चिम रेल्वेमध्ये ‘सीनियर सेक्शन इंजिनीअर’ म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पतीचे अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजल्याने जोडप्यात वारंवार वाद होऊ लागले.
रोजच्या वादाला कंटाळून पीडितेने ऑगस्ट 2024 मध्ये पतीचे घर सोडले. घर सोडल्यानंतर पती तिला शिवीगाळ, आत्महत्येची धमकी देणे आणि खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देऊ लागला. अखेर जून 2025 मध्ये पीडितेने वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर पती अधिकच आक्रमक झाला.
आरोपीने पत्नीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून तिची माहिती बदलून तिच्या नावाने तिच्या मित्रांशी चॅटिंग सुरू केले. 15 जानेवारी 2026 रोजी त्याने तिच्या अकाऊंटवर आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट अपलोड केल्या. त्यानंतर 18 मार्च 2026 रोजी पुन्हा तिचे खासगी फोटो ‘वन-टाईम व्ह्यू’ कॅप्शनसह पोस्ट केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पीडितेच्या मैत्रिणीला आणि तिच्या पतीलाही अश्लील व्हॉईस मेसेज पाठवून पत्नीची बदनामी केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर, दिंडोशी पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



























































