
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. एका स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना मारूती एक्सएल 6 ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतातील विहिरीमध्ये कोसळली. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. भरधाव वेगातील कार (क्र. एमएच 15, जेएस 1053) शिवाजी नगर भागातील राजेंद्र राजे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये पडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट विहिरीत जाऊन उटलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विहीर तुडुंब भरलेली असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि इंदोरे येथील दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा करूण अंत झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफ, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू होते. विहिरीत पडलेली कार बाहेर काढण्यासाठी दोन हायड्रो क्रेनही पाचारण करण्यात आल्या होत्या. रात्री साडे बाराच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कार विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. पोलीस तपासामध्ये मृतांची ओळख पटली असून सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचे कळते.
आम्ही सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण काय होते याचा अधिक तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती दिंडोरी पोलीस निरीक्षकांनी दिली.
Nashik, Maharashtra: On the night of April 3 in Dindori Village, a Maruti XL car carrying nine family members fell into a water-filled roadside well, killing all, including children aged 7–14. Rescue teams recovered the car, and police have registered a case.
(Source: Police… pic.twitter.com/TZ7IZ0p6fs
— IANS (@ians_india) April 4, 2026
मृतांची नावे
सुनील दत्तू दरगुडे (वय – 32), रेश्मा सुनील दरगुडे (वय – 27), राखी उर्फ गुणवंती सुनील दरगुडे, आशा अनिल दरगुडे (वय – 32), खुशी उर्फ सृष्टी अनिल दरगुडे (वय – 14), माधुरी अनिल दरगुडे (वय- 13), श्रेयस अनिल दरगुडे (वय – 11), श्रावणी अनिल दरगुडे (वय – 11) आणि समृद्धी राजेंद्र दरगुडे (वय – 7) अशी मृतांची नावे आहेत.

























































