
अफगाणिस्तानच्या हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये शुक्रवारी रात्री 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाच्या धक्क्यानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एक घर कोसळून एका लहान मुलासह किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की अफगाणिस्तान, पाकिस्तानसह संपूर्ण उत्तर हिंदुस्थान आणि दिल्ली-एनसीआर परिसर हादरून गेला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदु अफगाणिस्तानमधील बदख्शान प्रांतातील हिंदूकुश पर्वतरांगामध्ये जमिनीखाली 150 किलोमीटर आहे. भूकंपाची तीव्रता 5.8 ते 5.9 रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानसह उत्तर हिंदुस्थानलाही जाणवले. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दिल्ली, नोएडा, चंदिगड, लुधियाना आणि जम्मू-कश्मीरच्या विविध भागांत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पाकिस्तानची राजधानी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, पेशावर आणि पंजाब प्रांतातील शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
काही सेकंद घरे आणि घरातील पंखे, बेड यांसारख्या वस्तू जोरात हलत होत्या. अचानक आलेल्या या धक्क्यांमुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर मोकळ्या मैदानात धावले, अशी माहिती टोलेजंग इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी दिली आहे. कश्मीरमधील काही रहिवाशांनी हा आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात तीव्र धक्का असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान हा देश हिंदुस्थान आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर असल्याने येथे वारंवार भूकंप होत असतात. संयुक्त राष्ट्रांच्या मते, अफगाणिस्तान आधीच अनेक वर्षांचा लष्करी संघर्ष आणि गरिबीने खचलेला आहे. अशात भूकंप, दरडी कोसळणे आणि पूर यांसारख्या वारंवार येणाऱ्या आपत्तींमुळे येथील नागरिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

























































