
मध्य पूर्वेत सुरू असलेला संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करार करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. करार केला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल असा निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांनी दिला. मात्र ट्रम्प यांच्या धमकीला इराणने भीक घातलेली नाही. उलट इराणनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून संपूर्ण आखात अमेरिका-इस्रायलसाठी नरक बनेल अशी धमकी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डसने दिली आहे.
अणुप्रकल्पावर हल्ला कराल तर संपूर्ण आखात नष्ट होईल! इराणचा जगाला इशारा
इराणच्या ‘खातम अल-अनबिया’ सेंट्रल हेडक्वार्टरचे प्रवक्ते इब्राहिम जोल्फाघारी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीचा खरपूस समाचार घेतला. जर तणाव असाच वाढत राहिला, तर संपूर्ण मध्य पूर्व परिसर अमेरिका आणि इस्रायलसाठी नरक बनेल. इराणने आधीच आपले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अमेरिका आणि इस्रायलच्या अनेक तळांना लक्ष्य केले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच इराणला पराभूत करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे युद्ध एका दलदलीत अडकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Once evil takes root, it turns the whole region into a living hell.
What you thought was victory over Iran has turned into a deadly quagmire pulling you under. pic.twitter.com/G5fPtX97ny
— Ebrahim Zolfaghari (@Irantimes72) April 4, 2026
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवरून इराणला शेवटची ताकीद दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला करार करण्यासाठी किंवा होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी फक्त 48 तासांचा वेळ दिला आहे. जर मुदतीत निर्णय झाला नाही, तर इराणवर प्रचंड मोठा हल्ला करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. तसेच ट्रम्प यांनी इराणला थेट पाषाण युगामध्ये पाठवण्याचीही धमकी दिली आहे.

























































