पतसंस्थेच्या बनावट खात्यांमधून केला 60 कोटींचा व्यवहार, भोंदू अशोक खरातचा नवा कारनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. पोलीस तपासात दररोज नवी माहिती समोर येत आहे. कोपरगावच्या समता पतसंस्थेतील बनावट खात्यांमधून 60 कोटींचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. कोटय़वधीचे व्यवहार झालेला खातेधारक नामकर्ण आवारे याची शिर्डी पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत त्याने ‘ती’ खाती आपली नसल्याचा दावा करतानाच, खाते उघडण्यासाठी कधी गेलोच नाही, असा धक्कादायक जबाब पोलिसांना दिला.  

शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणात सिन्नरची जगदंबा आणि कोपरगावच्या समता पतसंस्थेची राहाता शाखा चर्चेत आली आहे. दोन्ही संस्थांमध्ये 132 वेगवेगळ्या नावांनी बनावट खाती उघडण्यात आली. त्या सर्व खात्यांचा वारसदार अशोक खरातच आहे. याशिवाय त्याचाच मोबाईल नंबर या खात्यांना लिंक आहे. समता पतसंस्थेतून तब्बल 60 कोटींचे व्यवहार करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर हे व्यवहार पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

पोलिसांनी प्राथमिक तपासात खातेधारकांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्वलिखित पुस्तकात भोंदू खरातची भलामण करणारा नामकर्ण आवारे याची शिर्डी पोलिसांनी चौकशी केली. त्याची सहा खाती समता पतसंस्थेत आहेत. आवारे स्वतः जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आवारेंची दोन तास चौकशी केली. या चौकशीत आवारे यांनी सांगितले, की ‘समता’मध्ये असलेली सहा खाती आणि स्वाक्षरीही माझी नाही. त्यावरील 1 कोटी 20 लाखांचे व्यवहारही मी केलेले नाहीत. मी कधीही संस्थेत खाते उघडण्यासाठी गेलो नाही, असा जबाब दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याशिवाय अन्य काही खातेधारकांनीही पोलिसांशी संपर्क साधत ‘ते’ खाते आमचे नाही, असे सांगितल्याची माहिती पुढे येत आहे. ज्यांच्या नावे खाते आहे, ते खातेधारकच आता इन्कार करू लागल्याने गूढ वाढत चालले आहे.