
लग्नानंतर मुलगी सासरी सुखी राहावी, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. मात्र, जर नातं ओझं ठरत असेल, तर त्यातून बाहेर पडणे हाच शहाणपणा असतो. हीच सकारात्मकता मेरठमधील एका निवृत्त न्यायाधीशांनी दाखवून दिली आहे. आपली मुलगी विनिता शर्मा हिचा घटस्पह्ट मंजूर झाल्यानंतर, तिचे वडील ज्ञानेंद्र शर्मा यांनी तिचे स्वागत दुःखात न करता मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात केले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विनिता शर्माचा 2018 साली विवाह झाला होता. मात्र, ती तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हती. अखेर अनेक वर्षांच्या खडतर प्रवासानंतर विनिताला न्यायालयातून घटस्फोट मिळाला. घटस्फोट मिळताच तिच्या कुटुंबाने कोर्टाबाहेर ढोल-ताशांचा गजर सुरू केला. नातेवाईकांनी तिथे नृत्य केले आणि उपस्थित लोकांना पेढे वाटले. विशेष म्हणजे, कुटुंबातील सदस्यांनी काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते, ज्यावर प्रणिताचा फोटो आणि ‘आय लव्ह माय डॉटर’ असे संदेश लिहिले होते. मुलीला एकटे न पाडता, संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे हे एक बोलके उदाहरण ठरले.
























































