
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय आता रोजच्या जगण्याचा भाग बनू लागले आहे. अनेक गोष्टींमध्ये एआय माणसाची जागा घेऊ शकत नाही, असे म्हटले जाते. अशातच डिजिटल युगातील जेन- झी पिढी पॅचअपसाठी एआयची मदत घेत असल्याचे दिसून आले आहे. जोडीदारासोबतचा वाद कसा सोडवावा, यासाठी चक्क एआय मार्गदर्शक बनत आहे.
आपल्याला माहीत आहे की, एआयला कोणताही प्रश्न विचारा, त्याचे नेमके उत्तर मिळते. मित्रमैत्रिणींच्या वादात एआय माफीनाम्याचे रेडिमेड मुद्दे तयार करून देतो. माझे नेमके काय चुकले, काय बोलू, या प्रश्नांवर अत्यंत हळवे आणि समोरच्याच्या मनाला भिडतील, असे प्रभावी उत्तर मिळते. यामुळे नाते पुन्हा जुळायला मदत होते, असे जेन-झींचे मत आहे.
जोडीदारासोबत वाद झालाय पॅचअप कसे करावे, ते एआय सांगतो. एआयचे उत्तर असते की, रागावलेला असताना स्पष्टीकरण देऊ नका, रांग शांत झाल्यास चांगला संवाद होईल. अहंकार आणि झालेल्या चुका सोडून द्या. त्याचे म्हणणे समजून घेतल्यास पॅचअप सोपे होते.
सॉरीसाठी मेसेज कसा असावा, हेदेखील एआयला विचारले जाते. याशिवाय पॅचअपनंतर सुरुवात कशी करावी, याचे मार्गदर्शन घेतले जाते. भविष्यात असे वाद होऊ नयेत म्हणून काय करावे, हेदेखील एआयद्वारे जाणून घेतले जाते.


























































