
उरणकरांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शहरात 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र गेल्या 15 वर्षांपासून हे रुग्णालय कागदावरच आहे. रखडलेल्या कामामुळे रुग्णालयाचा खर्च 58 कोटींवरून 82.54 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यातच सिडकोने रुग्णालयासाठी दिलेल्या 5900 चौरस मीटर जागेपैकी 980 चौरस मीटर जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहे. यामुळे येथील रुग्णांचे हाल होत असून त्यांना नवी मुंबई, पनवेल, मुंबईमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.
उरण परिसरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्यामानाने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी अपुरी पडतात. आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सिडकोने रुग्णालयासाठी बोकडविरा गाव हद्दीत 5900 चौरस मीटर भूखंड दिला आहे. या भूखंडावर नियोजित रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली होती. शासनाने यासाठी 15 वर्षांपूर्वी 52 कोटी रुपये निधीही मंजूर केला होता.
तिढा सुटलेला नाही
सिडकोने दिलेल्या भूखंडावरील 980 चौरस मीटर जागेवर खारफुटीची झाडे उगवल्याने 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सीआरझेडच्या कचाट्यात सापडले आहे. सीआरझेडचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठपुरावा करण्यात आला तरीही तिढा सुटला नाही. यामुळे कामाला विलंब होत चालला आहे.15 वर्षांपासून लटकलेल्या कामामुळे 58 कोटी खर्चाचे काम 82.54 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असल्याची माहिती उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली.
इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचा भार तीन डॉक्टरांवर आहे. बाह्यरुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र गेल्या 25 वर्षांपासून डॉक्टरांच्या संख्येत वाढ झालेली नाही. डॉक्टरांची पदे वाढवण्याची आवश्यकता आहे. रुग्णवाहिकेसाठी एका वाहनचालकाचे पद रिक्त आहे.
बाळासो काळेल, वैद्यकीय अधीक्षक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय




























































