
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने उमेदवार दिला आहे. काँग्रेसची एक भूमिका असून ते शक्यतो बिनविरोध निवडणुकीचा जो पॅटर्न आहे त्याला विरोध करतात. असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनीही अनेकदा केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचा बिनविरोध पॅटर्न बदलला. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात साधारण एक संवेदनशीलता होती. भाजपच्या काळात महाराष्ट्राची संवेदना ही मारून टाकली, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.
नांदेडला काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचे निवडणुकीनंतर काही दिवसात निधन झाले. ही निवडणूक बिनविरोध होऊ द्या अशी विनंती आम्ही सगळ्यांनी केली होती. तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाने तिकडे उमेदवार दिला आणि अमित शहांपासून अनेक नेते प्रचाराला आले. पंढरपूरला भालकेनानांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पत्नी उभ्या असल्याने निवडणूक बिनविरोध होऊ द्या अशी विनंती आम्ही केली. तिथेही देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार दिला. अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिला. जेव्हा त्यांची सोय किंवा गैरसोय असते तेव्हा ते म्हणतात बिनविरोध होऊ द्या, असे संजय राऊत म्हणाले.
लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. त्या अजित पवार गटासोबत नव्हत्या. तेव्हा अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात नाना काटे यांना उमेदवार दिली आणि त्यांनी 99 हजार मतं घेतली, असेही राऊत म्हणाले. तसेच ज्यांना सरकार विरोधात आपला राग व्यक्त करायचा आहे त्यांच्यासाठी निवडणूक हे व्यासपीठ असते, असेही ते यावेळी म्हणाले.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्री असून अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्या निवडणूक लढत आहेत. आमच्या त्यांनी शुभेच्छा आहेत. सुनेत्रा पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये असून तिकडे काँग्रेसने उमेदवार उभा केल्याची माहिती आहे. बारामती हा पवारांचा गड आहे. तिथे काय निकाल लागेल हे सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणात काही जे विषय सामोपचाराने घ्यायचे असतात. आज त्या फक्त अर्ज भरणार आहेत. निवडणुकीला वेळ आहे. थांबा तोपर्यंत.
उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. पण त्यांनी पक्ष सोडला आणि ते भाजप बरोबर गेले हे कसे विसरता? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचेही स्नेहपूर्ण संबंध होते. पण आता ते ज्या बाजूला उभे आहेत ती महाराष्ट्राच्या हिताची, फायद्याची, स्वाभिमानाची नाही. अशा वेळेला आम्हाला विचार करावा लागतो. आम्ही कितीही संवेदनशील असलो तरी राजकीय निर्णय घेताना चर्चा करावी लागते. नाती-गोती काहीवेळा दूर ठेवावी लागतात आणि निर्णय घ्यावे लागतात. आम्ही आजही महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभे आहोत. तसे जर नसते तर कालच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढलो नसतो, असेही राऊत म्हणाले.




























































