
दिल्लीतील प्रतिष्ठित दिल्ली विद्यापीठात सोमवारी खळबळ उडाली. विद्यापीठाच्या रामजस कॉलेज आणि मिरांडा कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने दोन्ही महाविद्यालयांचे कॅम्पस रिकामे केले असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महाविद्यालयांच्या प्रशासनाला सोमवारी सकाळी एक ईमेल आला. या ईमेलमध्ये महाविद्यालयाच्या आवारात स्फोटक उपकरणे ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने पावले उचलली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDS) तसेच श्वान पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. खबरदारी म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले.
सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून दोन्ही महाविद्यालयांच्या कानाकोपऱ्याची कसून शोध घेतला जात आहे. अद्यापपर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू हाती लागलेली नाही, मात्र तपास सुरू आहे. हा धमकीचा ईमेल नेमका कुठून आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध सायबर सेलच्या मदतीने घेतला जात आहे. वारंवार मिळणाऱ्या अशा बनावट धमक्यांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.


























































