
भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘वॉशिंग मशीन’ आहे. भ्रष्टाचारी, गुंड किंवा बलात्कारी असे कोणतेही आरोप असलेले नेते आले की भाजपच्या वाशिंग मशिनमधून लगेच स्वच्छ होऊन बाहेर पडतात. या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावर जुन्या फाईल्स एक तर थंड बस्त्यात जातात आणि सदर व्यक्तीला क्लीन चिटही मिळते, असा आरोप विरोधक सतत करत असतात. पण आता भाजप प्रवेश करताच सरकारी सुरक्षा व्यवस्थेची विशेष ‘रॉयल ट्रिटमेंट’ही मिळू लागली आहे. याचाच प्रत्यय पश्चिम बंगालमध्ये आला असून भाजप प्रवेश करताच हिंदुस्थानचा माजी टेनिसपटू लिएंडर पेस यां एक्स दर्जाची सुरक्षा मिळाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना माजी टेनिसपटू लिएंडर पेस यांनी राजकीय पीचवर उतरण्याचा निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. त्याच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिएंडर पेस सक्रिय राजकारणात उतरले असून त्यांच्या वाढत्या सार्वजनिक वावरामुळे गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, 52 वर्षीय लिएंडर पेस यांनी गेल्याच आठवड्यात दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये होते. बंगाल निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या ‘स्टार प्रचारकां’च्या यादीत पेस यांचे नाव आघाडीवर आहे.



























































