
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी कोलकाता शहरावर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर पंतप्रधान गप्प का आहेत, असा थेट सवाल त्यांनी सोमवारी नादिया येथील एका निवडणूक सभेत बोलताना विचारला. निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालला सतत लक्ष्य करणारे पंतप्रधान देशाच्या सुरक्षेला असलेल्या या आव्हानावर एक शब्दही का बोलत नाहीत, अशी संतप्त सवाल करत ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या कूचबिहारमधील सभेचा संदर्भ देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचारात बंगालच्या विरोधात बोलण्यात धन्यता मानतात, मात्र पाकिस्तान जेव्हा थेट बंगालवर हल्ला करण्याची भाषा करतो, तेव्हा केंद्र सरकारची मुत्सद्देगिरी कुठे जाते? या गंभीर मुद्द्यावर कठोर भूमिका घेण्याऐवजी पंतप्रधान मौन बाळगून आहेत. जर पंतप्रधान आपल्या देशाच्या एका राज्याला मिळालेल्या धमकीवर ठोस कारवाईचे आश्वासन देऊ शकत नसतील, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे खडेबोल त्यांनी सुनावले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात पाकिस्तानला गंभीर इशारा द्यायला हवा होता, असे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. आम्ही देशासमोरील कोणतेही आव्हान जसे शांतपणे सहन करत नाही, तसेच कोलकाता किंवा बंगालला असलेला कोणताही धोका आम्ही खपवून घेणार नाही, असे पंतप्रधानांनी ठणकावून सांगायला हवे होते, असेही त्या म्हणाल्या. केंद्राच्या या भूमिकेला त्यांनी ‘उदासीनता’ असे संबोधत, बंगालची जनता आगामी निवडणुकीत याला चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हा संपूर्ण वाद पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या चिथावणीखोर विधानानंतर सुरू झाला आहे. हिंदुस्थानने कोणतीही लष्करी कारवाई केल्यास पाकिस्तान कोलकातापर्यंत हल्ला करण्याची क्षमता ठेवतो, अशी धमकी आसिफ यांनी सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली होती. या धमकीमुळे पश्चिम बंगालमध्ये संतापाची लाट असून, ममता बॅनर्जी यांनी हा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.
























































