शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला, अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील गुना येथे एका मिशनरी शाळेत मधमाशांनी अचानक विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केल्याची घटना घडली. यात अनेक विद्यार्थी आणि काही शिक्षक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे पसरले आहे. वंदना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ही घटना घडली. विद्यार्थी वर्गातून बाहेर पडत असताना मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे विद्यार्थी घाबरून सैरावैरा धावू लागले. या घटनेमुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. अनेक मुले वेदना व भीतीने रडू लागली. शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुलांना सुरक्षित ठिकाणी नेले. घटनेची माहिती मिळताच, शिक्षण विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांना तात्काळ प्रथमोपचार देण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, असे आज तकने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शाळेच्या आवारात आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.