गायक महेश काळे यांचा स्वरसंध्या कार्यक्रम रद्द झाल्याने गोंधळ, प्रेक्षकांना बसला आर्थिक भुर्दंडच; आयोजकांवर कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुलच्या मैदानावर आयोजित केलेला गायक महेश काळे यांचा स्वरसंध्या हा गाण्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने बुक माय शो ॲपवरून तिकिट खरेदी केलेल्या अनेक रसिकप्रेक्षकांची फसवणूक झाली. स्वरसंध्या कार्यक्रम रद्द झाल्याची आगाऊ सूचना ऑनलाइन तिकिट खरेदी करणाऱ्या प्रेक्षकांना न दिल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड पडला आहे.प्रेक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात अर्ज देऊन आयोजकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा तसेच आमच्या तिकिटासह आमचा प्रवास खर्च आम्हाला परत करावा अशी मागणी केली आहे.

गायक महेश काळे यांचा स्वरसंध्या हा गाण्यांचा कार्यक्रम एकदंत थिएटर्स आणि ताल क्रिएशन्स यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची तिकिट विक्री बुक माय शो ॲपवर सुरू होती त्यामुळे रत्नागिरीसह कोल्हापूर,मुंबई आणि पुणे येथून रसिक प्रेक्षकांनी तिकिटे खरेदी केली होती. रत्नागिरीतील प्रेक्षकांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहाच्या तिकिट खिडकीवरून तिकिटे खरेदी केली होती.सुमारे दीड हजार आसनक्षमता असणारा हा कार्यक्रम होता मात्र तिकिटविक्रीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.काही दिवसांपूर्वीच हा स्वरसंध्या कार्यक्रम रद्द करण्यात आला मात्र ऑनलाइन बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना हा कार्यक्रम रद्द झाल्याची पूर्वसूचना न दिल्याने रविवारी हे प्रेक्षक कार्यक्रम स्थळी दाखल झाले त्यावेळी त्या मैदानावर रंगमंच व खुर्च्या काहीच नसल्याने त्यांना धक्का बसला.त्यांनी चौकशी केली असता कार्यक्रम रद्द झाल्याचे कळले.कोल्हापूर,मुंबई आणि पुण्यातून आलेल्या अनेक प्रेक्षकांचे येण्याजाण्याचा खर्च आणि हॉटेलचे बुकींगचा खर्च झाल्याने प्रचंड नुकसान झाले.तिकिटाचे पैसेही अद्याप परत न केल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी रत्नागिरी शहर पोलिसांना अर्ज देऊन आयोजकांवर कारवाई करावी व आमची नुकसान भरपाई आयोजकांनी द्यावी अशी मागणी केली आहे.