
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशई संवाद साधला. यावेळी बारामती मतदारसंघातील पोटनिवडणूक राजकारण आणि दोन्ही पक्षातील विलीनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपला उमेदवार उतरवला आहे. आकाश मोरे हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत असून, त्यावर शरद पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केले. काँग्रेसने बारामती विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणे चुकीचे नाही. निवडणूक बिनविरोध करण्याचे काही कारण नाही. समोर कुणीतरी असेल हे मान्य करून निवडणुकीत उतरायला हवे. कुटुंबप्रमुख म्हणून या निवडणुकीची माझ्यावर जबाबदारी आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. निवडणूक लढवताना समोर कुणीतरी प्रतिस्पर्धी असेल हे गृहित धरूनच मैदानात उतरावं, असा सल्ला त्यांनी दिला. राजकीय घडामोडींमध्ये बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असताना पवारांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे बारामतीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चा होत आहे.
आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू नाही, असं सांगत शरद पवारांनी सुरु असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अलीकडच्या घडामोडींमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना पवारांच्या या वक्तव्यामुळे चित्र स्पष्ट झालं आहे.
पक्षाच्या भविष्यासंदर्भात आणि आघाड्यांच्या शक्यतांबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये पवारांनी ठाम भूमिका मांडत कोणत्याही विलिनीकरणाच्या शक्यतेला नकार दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांबाबत चर्चा होत आहेत.

























































