आखातातील युद्धजन्य परिस्थितीत हिंदुस्थानींचे प्रश्न सोडवण्यात पंतप्रधान मोदी ‘अपयशी’: प्रियंका गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार आखातातील युद्ध परिस्थितीमुळे उद्भवलेले प्रश्न सोडवण्यात ‘अपयशी’ ठरले आहेत, असा हल्लाबोल केला. तसेच त्यांच्या अपयशाचा परिणाम लाखो हिंदुस्थानींना भोगावा लागत असल्याचेही त्या म्हणाल्या.

९ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचासाठी पेरावूर येथे एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी दावा केला की, त्या भागात राहणाऱ्या हिंदुस्थानींच्या सुरक्षेसाठी पुरेशा तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत.

आखातातील परिस्थितीचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने येणाऱ्या दिवसांत हिंदुस्थानसमोर अधिक समस्या निर्माण होऊ शकतात.

बीझनेस स्टँडर्डने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधानांवर निशाणा साधताना त्यांनी आरोप केला की, ‘मोदी अमेरिका आणि इस्रायलसमोर ‘जी हुजुरी’ खूप व्यस्त आहेत’. त्याचप्रमाणे, त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावरही ‘मोदींची जी हुजुरी करण्यात व्यस्त’ असल्याचा आरोप केला.

त्यांच्या मते, इंधन दर सातत्याने वाढत आहेत आणि केंद्र सरकारने ऊर्जा क्षेत्र अमेरिकेच्या स्वाधीन केले आहे. त्या म्हणाल्या, ‘आज अमेरिका ठरवत आहे की तेल कोठून विकत घ्यावे, कोणी विकत घ्यावे आणि कसे विकत घ्यावे’.

काँग्रेस नेत्यांनी असाही आरोप केला की, केंद्र सरकारने असे करार केले आहेत ज्यामुळे हिंदुस्थानी शेतकऱ्यांचे नुकसान होईल, कारण त्यांना अमेरिकेतील आधुनिक शेतीशी स्पर्धा करावी लागेल. त्या म्हणाल्या, ‘त्यांनी आपल्यावर टॅरिफ लादले आहे आणि आपण त्यांच्यासाठी कर हटवले आहेत. आपण अमेरिकेकडून ९ लाख कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी करणार आहोत’, अशा धोरणांमुळे देशाच्या समस्या अधिक वाढतील, असेही त्यांनी नमूद केले.

वाड्रा पुढे म्हणाल्या की, ‘जातीयवादी राजकारण आणि भ्रष्टाचार’ देशाला मागे नेईल. एक हिंदुस्थानी म्हणून मला दुःख वाटते की, आपले नेतृत्व भित्रे आणि तडजोड करणारे आहे’. लोकांनी जागे होण्याची वेळ आली आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांनंतर दोन दिवसांनी प्रियांका गांधींनी त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी आरोप केला होता की, त्यांना राजकीय फायदा मिळवण्यासाठी काँग्रेस आखातातील देशांशी हिंदुस्थानचे संबंध बिघडवणारी ‘प्रक्षोभक’ विधाने करत आहे.