
पत्नीकडे असलेल्या कथित एकापेक्षा अधिक देशांच्या पासपोर्टच्या प्रश्नांमुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या पत्नीकडे कथितपणे एकापेक्षा जास्त पासपोर्ट आणि परदेशात मालमत्ता असण्यासंदर्भात काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करत आरोप करण्यात आले होते. हे आरोप हिमंता बिस्वा सरमा यांनी फेटाळून लावले. मात्र यानंतर काही तासांतच, लोकसभा खासदार गौरव गोगोई यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना श्रीभगवद्गीतेवर हात ठेवून करण्यात आलेले आरोप नाकारण्याचे आव्हान दिले आहे.
राहा येथील प्रचार सभेनंतर पत्रकारांशी बोलताना आसाम काँग्रेस अध्यक्षांनी सरमा यांना प्रश्न विचारला की, राजकीय विरोधकांबाबत ‘खोटे’ पसरवत असताना ते स्वतःची परदेशातील मालमत्ता आणि व्यावसायिक हितसंबंध लपवत आहेत का?
काँग्रेस नेते पवन खेडा आणि गोगोई यांनी सरमा यांच्या पत्नीकडे तीन विदेशी पासपोर्ट आहेत का, दुबईत मालमत्ता आहे का, अमेरिकेत कंपन्या आहेत का किंवा शेल कंपन्यांमध्ये मालमत्ता गुंतवली आहे का, असे प्रश्न विचारले होते. यावर सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, विरोधी पक्षाने एका पाकिस्तानी सोशल मीडिया ग्रुपवरील चुकीच्या माहितीचा वापर करून हे बनावट आरोप रचले आहेत. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

























































