
वाराणसीतील नाविक समाजाकडून दरवर्षी दशाश्वमेध घाटावरून मिर्झापूरमधील अदलहाट येथील मोठ्या शीतला मातेच्या मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्याची जुनी परंपरा आहे. यावर्षी देखील नाविक ही शोभायात्रा घेऊन निघाले होते. मात्र, या धार्मिक प्रवासादरम्यान काही नाविकांनी बोटीवरच डीजे लावून मोठ्या आवाजात संगीत वाजवले आणि मद्यप्राशन करून जोरदार डान्स केला. पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या मध्यधारेत सुरू असलेल्या या कृत्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरून सर्वत्र पसरल्यानंतर पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दशाश्वमेधचे एसीपी अतुल अंजान त्रिपाठी यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, धार्मिक स्थळाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना सोडले जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गंगेच्या पात्रात ‘बीयर पार्टी’; डीजेच्या तालावर मद्यपान आणि धिंगाणा, भाविकांचा संताप#gangariver #varanasi #ᴠɪʀᴇʟᴠɪᴅᴇᴏ pic.twitter.com/EuOOB3SydC
— Saamana Online (@SaamanaOnline) April 6, 2026
पवित्र गंगेच्या पात्रात अशा प्रकारे जाहीरपणे नशा करणे आणि गोंधळ घालणे यावर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. श्रद्धा आणि परंपरेच्या नावाखाली अशा अश्लील आणि बेशिस्त वर्तनामुळे वाराणसीच्या सांस्कृतिक प्रतिमेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नाविकांचा शोध घेत आहेत.

























































