IPL 2026 – टी20 वर्ल्ड कपमध्ये खोऱ्याने धावा काढणारा संजू सॅमसन अजूनही शांत का? प्रशिक्षकाने सांगितले कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून, सलग तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या या अपयशामागे खराब गोलंदाजीसोबतच संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा खराब फॉर्म हे मोठे कारण मानले जात आहे. विशेषतः संजू सॅमसनला अद्याप एकाही सामन्यात दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. त्याने तीन सामन्यांत अनुक्रमे 6, 7 आणि 9 अशा एकूण केवळ 22 धावा केल्या आहेत.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी संजू सॅमसनच्या खराब फॉर्मचे समर्थन केले. फ्लेमिंग म्हणाले की, “जेव्हा एखादा खेळाडू राजस्थान रॉयल्ससारख्या फ्रेंचायझीसाठी प्रदीर्घ काळ खेळतो, तेव्हा त्याला नवीन संघाच्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. संजू सध्या त्याच प्रक्रियेतून जात आहे.” संजू सॅमसन धावा काढण्यासाठी प्रचंड उत्सुक असून, नवीन वातावरणात तो पूर्णपणे रुळला असला तरी, मैदानावरील कामगिरीत सातत्य येण्यासाठी त्याला थोडा वेळ देणे गरजेचे असल्याचे फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले.

IPL 2026 – MS धोनीच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट; दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणार?

चेन्नईच्या संघात यावर्षी 5 ते 6 मोठे बदल झाले असून, खेळाडूंमधील ताळमेळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फ्लेमिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “संजूने विश्वचषकात दाखवून दिले आहे की, एकदा तो फॉर्मात आला की किती घातक ठरू शकतो. त्यामुळे चेन्नई संघ व्यवस्थापनाचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल.” खराब गोलंदाजी आणि फलंदाजीतील अपयश सुधारण्याचे आव्हान आता चेन्नईसमोर असून, त्यांचा पुढचा सामना 11 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.