ग्रामस्थांचा उठाव; बंद करा बंद करा, लक्ष्मी ऑर्गानिक बंद करा! कोकणवासियांचा लक्ष्मी ऑर्गेनिक कारखान्या विरोधात विराट मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणचा निसर्ग आमचा श्वास बंद करा, पीफास, कारखाना नाही आमचा जीव मोठा, कारखाना बंद नाहीतर आंदोलन तीव्र, लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज मधील पीफास हे घातक उत्पादन बंद झालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत आज लक्ष्मी ऑर्गेनिकच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संघर्ष समिती, जन आक्रोश समिती यांनी एकत्र येऊन प्रशासनाला आणि सरकारला जाग आणण्यासाठी आज हा मोर्चा काढला.

इटलीमध्ये यापूर्वी एक दुर्घटना घडली होती. तेथीलमिटेनी कंपनीमध्ये पीफास या रसायनाची निर्मिती केली जात होती. मात्र त्या प्रक्रियेच्या दरम्यान तयार होणारे टाकाऊ रासायनिक सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता थेट नदीत सोडून दिले होते. पाणी दूषित होऊन सुमारे तीन ते चार हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर असला घातक प्रकल्प आमच्या निसर्गरम्य कोकणात आणून इथले मानवी जीवन उध्वस्त करून कोकणचा निसर्ग धोक्यात आणण्याचा प्रयत्न सरकार का करत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

मनसेचा सहभाग

या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वीच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर मनसेनेही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आज मनसे सोबतच आणखीही काही संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

हा मोर्चा मुंबई गोवा महामार्गावरील एक्सल फाटा येथून निघाला. पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला होता. लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीपासून ५०० मीटर अंतरावरच हा मोर्चा थांबवण्यात आला होता. याठिकाणी पोहचल्यानंतर आंदोलकांनी जोरदार निदर्शने करत सरकारचा निषेध केला.

लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत पीफास रसायनाच्या निर्मितीमधून प्रक्रियेदरम्यान दुर्घटना घडल्यास कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ इतकेच काय तर सरकारकडे सुद्धा कायदा अस्तित्वात नाही. अशावेळी भविष्यात काही दुर्घटना घडली तर या कारखान्यावर कारवाई कोण करणार असा संतप्त सवाल आंदोलकांनी विचारला.

यावेळी अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, उदय घाग, कांचन चाळके, रवींद्र गोवळकर, अविनाश आंबे, दिलीप घाग, सचिन चाळके, संजय चाळके, पं.स. सदस्य अजय चाळके, मनसे दक्षिण रत्नागिरी संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह इतरही अनेक संघटना आणि शेकडो कोकणवासीय महिला आणि पुरुष आंदोलन उपस्थित होते.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष. ७५ दिवसाहून अधिक काळ लक्ष्मी ऑर्गानिक विरोधात
आंदोलन सुरू आहे.ग्रामस्थ उपोषण करत आहेत मात्र जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.