
कोरोना महामारीच्या काळात मदुराई येथे लॉकडाऊन दरम्यान दुकान उघडे ठेवल्यामुळे अटक करण्यात आलेल्या पितापुत्रांचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी मदुराई येथील सत्र न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असून पोलिसांनी अतिशय निर्दयतेने कोठडीत मारहाण केली, हा प्रकार म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचे न्यायालयाने निकाल देताना म्हटले.
पी. जयराज (59) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (31) यांना पोलिसांनी 19 जून 2020 रोजी अटक केली होती. त्यांचे मोबाईल विक्रीचे दुकान होते. लॉकडाऊनदरम्यान त्यांनी दुकान सुरू ठेवले म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. दोघांना सथानकुलम पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. मात्र, पोलीस ठाण्यात त्यांना निर्दयी आणि अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. शरीरावर रक्तस्रावाचे डाग होते. याप्रकरणी न्यायालयाने 23 मार्च रोजी आरोपींना दोषी ठरवून शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता.
कोठडीत ठरवून टॉर्चर केले – न्यायालय
सीबीआयने दावा केला, की कोठडीमध्ये पिता-पुत्राला ठरवून टॉर्चर करण्यात आले. तो दावा सत्र न्यायालयाचे न्या. जी. मुथुकुमारन यांनी मान्य केला. म्हणूनच सर्वोच्च शिक्षा दिल्याचे न्या. मुथुकुमारन म्हणाले. सथानकुलम ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजदेखील सुरक्षित ठेवण्यात येत नसल्याचे तपासात उघडकीस आले होते.
हे आहेत दोषी
दोषींमध्ये पोलीस निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन, हेडकॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए. समदुरई, कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुरई, एक्स थॉमस फ्रान्सिस, एस. वेलुमुथू यांचा समावेश आहे. विशेष पोलीस उपनिरीक्षक पॉलदुरई यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
मारहाण झाल्याचे सीबीआय चौकशीतून उघड
याप्रकरणी वातावरण प्रचंड तापल्यानंतर चेन्नई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवला. एका महिला पोलीस कर्मचाऱयाने सीबीआयला सांगितले, की पिता-पुत्राला कोठडीत संपूर्ण रात्रभर मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्यातील टेबल आणि लाठय़ांवर रक्ताचे डाग होते. हीच साक्ष याप्रकरणात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सर्व आरोपींनी मृतांच्या वारसांना एक कोटी 40 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचाही आदेश दिला आहे.


























































