
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धगधगत्या इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत अक्षम्य हेळसांड झाली. नगरविकास विभागाच्या इशाराऱ्यावर चालणाऱ्या प्रशासनाने दालनाची भग्नावस्था करून ठेवली. ठिकठिकाणी पाण्याची गळती, भिंतीना बुरशी, कुबट उग्र दर्प, तुटलेले सिलिंग, अस्वच्छता, कबुतरांचा वावर यामुळे या संपूर्ण दालनाची रयाच गेली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ते मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवतीर्थावर संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन निर्माण करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र लढण्याचा इतिहास आणि गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यातून सातत्याने मराठी माणसाला प्रेरणा मिळत राहो यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून या दालनाची निर्मिती झाली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या दालनाचे उद्घाटन केले होते. तेव्हा एकसंघ शिवसेनेचे सर्व नेते तिथे उपस्थित होते. पण साडेचार वर्षांच्या भाजपच्या प्रशासकीय कारकिर्दीतल हे दालन पूर्णपणे दुर्लक्षित झाले. आतल्या बहुमोत कलाकृती नष्ट झाल्या, वाळवी लागली. भिंती सडल्या, छतही गळतंय आणि मुख्यमंत्री, महापालिका प्रशासनाला याची दखल घ्यावी वाटत नाही, हे 106 हुतात्म्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेने मराठी माणसासाठी बरेच काही केले. त्यात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनही आहे. शिवसेनेने इतिहास निर्माण केला आणि इतिहास टिकवायचा प्रयत्न केला. पण भाजपच्या काळात हा इतिहास सडवण्याचा प्रयत्न झाला. काल तिथे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर गेल्या आणि तिथे काय अवस्था आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरी महापालिका, मुख्यमंत्री यांना जाग आली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ इकडे-तिकडे फिरत असते. त्यांनी एकदा तरी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची अवस्था स्वत: जाऊन पहावी. त्या दालनाला पुन्हा उर्जित अवस्था द्यावी असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल तर त्यांचे महाराष्ट्र प्रेम बेगडी आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
1 मे रोजी महाराष्ट्र दिन येईल तेव्हा सगळे जण हुतात्मा चौकात जाऊन पुष्पचक्र अर्पण करतील आणि कार्यभाग उरकतील. त्यांनी त्या दिवशी शिवसेनेने घडवलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनात सुद्धा जावे आणि त्याची काय अवस्था तुम्ही केलीय हे सुद्धा उघड्या डोळ्यांनी पहावी, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, तो संघर्ष, तो इतिहास या विषयी आत्मियता, जाणीव असणारी ही आमची शेवटची पिढी आहे आणि पुढच्या पिढीने सुद्धा ती आपल्या हृदयात जतन करून ठेवावी म्हणून ते दालन उभे राहिले. महापालिकेला काय भीक लागली आहे का? 90 हजार कोटींच्या ठेवी शिवसेनेने ठेवल्या होत्या. त्या आता मोडून मोडून खाताय… तुम्ही 1 हजार कोटींची कंत्राट रद्द केली आहेत, त्याच्यात 25 टक्के पैसे खाल्लेले आहेत. पण हे सगळी खाबुगिरी सुरू असताना कुणालाही संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचा विचार करावा वाटला नाही. मग कशाकरता जय महाराष्ट्र म्हणता? या राज्यकर्त्यांना जय महाराष्ट्र म्हणण्याचा अधिकार नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

























































