क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित राडा, रन आऊटच्या वादातून पंचाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट सामन्यादरम्यान रन आऊटच्या वादातून पंचाची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. डोला अजित बाबू (21) असे हत्या केलेल्या पंचाचे नाव आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेत आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक मैदानावर रविवारी सायंकाळी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात तीन संघ सहभागी झाले होते. मयत अजित बाबू आणि त्याचा मित्र बुदुमुरी चिरंजीवी पंच म्हणून काम पाहत होते. यावेळी दोन संघांमध्ये रन आऊटच्या निर्णयावरून जोरदार वाद झाला. अजित बाबू आणि चिरंजीवी यांनी मध्यस्थी करून मैदानावरच तो वाद मिटवला. मात्र, प्रेक्षका असलेल्या कांता किशोर नावाच्या तरुणाला याचा राग आला आणि त्याने पंच व खेळाडूंना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असे सर्कल इन्स्पेक्टर मल्लेश्वरा राव यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांताने नंतर पंचांना बोलावून हा वाद कायमचा मिटवण्याचे सुचवले. सामना संपल्यानंतर आरोपीच्या विनंतीनुसार अजित बाबू, चिरंजीवी आणि त्यांचे काही मित्र जवळच असलेल्या एका ठिकाणी गेले. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यानंतर किशोरने खिशातून चाकू बाहेक काढला आणि दोन्ही पंचांवर हल्ला केला.

अजित बाबू याच्या छातीवर चाकूने वार केल्यामुळे त्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच कोसळला. पळून जाण्याचा प्रयत्न असलेल्या चिरंजीवी यांच्यावरही चाकूने वार केले. या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही दुखापत झाली आहे.

जखमींना तात्काळ एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डोला बाबू याला पुढील उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अजित बाबूचे वडील डोला अप्पाला राजू यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी किशोरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.