
पुण्यातील रांजणगावमध्ये मातृत्वाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नेहमी किरकिर करायचा आणि दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत असल्याने आईने पोटच्या 11 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह बॅगेत भरून विहिरीत फेकला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मातेला अटक केली आहे. पूजा रविंद्र पवार असे आरोपी महिलेचे नाव आहे.
भांबार्डे येथील रविंद्र अशोक पवार यांनी 8 मार्च 2026 रोजी आपली पत्नी पूजा 11 महिन्यांच्या मुलासह घर सोडून गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. यानंतर टाकळी हाजी पोलिसांना 5 एप्रिल 2026 रोजी पूजा जांबूत गावच्या हद्दीत सापडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पूजाची चौकशी केली असता मुलाचा ओट्यावरून पडून मृत्यू झाला. यानंतर आपण घाबरून मुलाचा मृतदेह बॅगेत भरून विहिरीत फेकल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पूजाच्या जबाबनुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पूजाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. घटनेचे पुरावे गोळा करत मृतदेह सडल्याने तेथेच अंत्यविधी करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पूजाला विश्वासात घेत चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मुलगा नेहमी किरकिर करायचा. तसेच मुलामुळे दुसरा विवाह होण्यास अडचणी येत होता, त्यामुळे घरासमोरील कपडे धुण्याच्या सिमेंटच्या ओट्यावर डोकं आपटून त्याची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह बॅगेत भरला. त्यानंतर मृतदेह पाण्यात बुडून रहावा म्हणून त्यात दोन दगड भरले आणि बॅग शेतातील विहिरीत फेकून दिली. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे.

























































