
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युचा तपासासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणात पोलीस महासंचालकांनी स्वत: लक्ष घालावे अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली.
याबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित दादांच्या मृत्यूचा तपास हा ज्या वेगाने आणि दिशेने होणं अपेक्षित आहे तसं होताना दिसत नाही, अशी खंत देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे हे प्रकरण तपास आणि चौकशी अशा शाब्दिक खेळात अडकता कामा नये त्यामुळे आपण व्यक्तीशः लक्ष घालावे अशी विनंती रोहित पवार यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना केली.
”अजितदादांच्या विमान अपघाताच्या कर्नाटकमध्ये दाखल झालेल्या FIR च्या अनुषंगाने पुढील तपासासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संबंधित FIR हा पुढील तपासासाठी सीआयडीकडे पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु तपास आणि चौकशी अशा शाब्दिक खेळात हा तपास अडकता कामा नये. दाते साहेब यांची स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून ओळख आहे, त्यामुळं या गुन्ह्याचा FIR च्या अनुषंगानेच कसून तपास झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तसंच हा तपास ज्या वेगाने आणि दिशेने होणं अपेक्षित आहे तसं होताना दिसत नाही, त्यामुळं यामध्येही व्यक्तीशः लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.


























































