
पावसाने व्यत्यय आणलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात राजस्थान रॉयस्लने आपली विजयी धमाका सुरू ठेवला आहे. पावसाने धुमशान घातल्यामुळे 11-11 षटकांचा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 3 गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा केल्या मुंबईला जिंकण्यासाठी 151 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईचा सुरुवात खराब झाली. 50 धावांच्या आत मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतला होता. रायन रिकल्टन (8), रोहित शर्मा (5), सूर्यकुमार यादव (6), तिलक वर्मा (14) आणि हार्दिक पंड्या (9) हजेरी लावून माघारी परतले. त्यामुळे मुंबईला 11 षटकांमध्ये फक्त 123 धावांपर्यंत मजल मारता आली आणि राजस्थानने 27 धावांनी सामना खिशात घातला आणि विजयी हॅट्रीक साजरी केली.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या सलामीवीरांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. यशस्वी जयसवालने नाबाद 32 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूंमध्ये 5 खणखणीत षटकार ठोकत 39 धावा केल्या. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख पार पाडली आणि मुंबईला एकामागे एक मोठे हादरे दिले. रवी बिष्णोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा यांनी 2-2 विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला.



























































