पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच रहा! इराणमधील हिंदुस्थानींना दूतावासाकडून निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर हिंदुस्थानी दूतावासाकडून इराणमधील हिंदुस्थानींसाठी काही निर्देश काढण्यात आले आहेत. हिंदुस्थानच्या दूतावासाने इराणमधील हिंदुस्थानींना पुढचे 48 तास कुठेही न जाता जिथे आहात तिथेच थांबा असे निर्देश दिले आहेत.

”सर्व हिंदुस्थानी नागरिकांनी पुढील 48 तास जिथे आहात तिथेच थांबा. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच वीज प्रकल्प, लष्करी ठिकाणे आणि उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून दूर राहावे. सध्याच्या परिस्थितीत कोणतीही अनावश्यक हालचाल टाळा असे दूतावासाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा ४८ तासांचा अल्टीमेटम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धडकी भरवणारा इशारा दिला आहे. “होर्मुजचा मार्ग उघडा, अन्यथा नरकासारख्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागेल,” अशा कडक भाषेत ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला असून “वेळ वेगाने संपत आहे,” असेही त्यांनी बजावले आहे.