नाशिक शहरातील वृक्षतोडीला हरित लवादाची अंतरिम स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला न जुमानता महापालिका प्रशासनाने वृक्षतोड सुरूच ठेवली. (छाया : भूषण पाटील)

महापालिकेने शहरात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड सुरू केली आहे, याविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी मंगळवारी राष्ट्रीय हरित लवादाने संपूर्ण शहरातील वृक्षतोडीला 28 एप्रिलपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे, अशी माहिती अॅड. श्रीराम पिंगळे यांनी दिली. हा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी दिलासा ठरला आहे.

महापालिका अत्यंत चलाखीने वेगवेगळ्या क््प्त्या वापरून बेकायदेशीर वृक्षतोड करीत आहे. महापालिका ज्या नोटीसा काढते, त्यात झाडांची संख्या, प्रजाती अशी विस्तृत माहितीच नसते, तसेच हरकती मागवायच्या, सुनावणी घ्यायची पण अंतिम भूमिका प्रसिद्ध करायची नाही, असे प्रकार निदर्शनास आणून देण्यात आले. सुट्टय़ांच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ऑर्डर काढून लगेचच सुटीच्या दिवशी झाडांवर घाव घालायचे, याप्रमाणे अवघ्या सात दिवसात महापालिकेने पंधराशेहून जास्त झाडे तोडल्याचे समोर आले आहे. न्यायालयासमोर बाजू मांडणे प्रशासनाने टाळलेले आहे. यामुळे हरित लवादाने संपूर्ण शहरातील वृक्षतोडीला 28 एप्रिलपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे, असेही अॅड. पिंगळे यांनी सांगितले.

n तपोवनातील अकराशेहून अधिक वृक्षतोडीविरोधात काही महिन्यांपूर्वी नाशिककर एकवटले होते. जनआंदोलनाचा वणवा पेटला होता. त्यानंतरही रस्त्यांसह विविध विकासकामांच्या नावाखाली महापालिकेने शहरभर सर्रास वृक्षांची कत्तल सुरू ठेवली. मनीष बावीस्कर यांनी 30 मार्चला महापालिकेविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली. यावर आज पहिली सुनावणी झाल्याची माहिती अॅड. श्रीराम पिंगळे यांनी दिली.