
>> प्रभाकर पवार
निर्माता-दिग्दर्शक आदित्य धर व ज्योती देशपांडे यांचा ‘धुरंधर-२’ हा हिंदी चित्रपट सध्या फारच गाजत आहे. ‘दंगल’, ‘बाहुबली-2’, ‘पुष्पा-2’ या चित्रपटांनंतर ‘धुरंधर-२’ हा 1500 कोटी रुपये कमावणारा चौथा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 200 च्या दशकातील वास्तववादी हेरगिरी घटनांवर आधारित एक थरारक अॅक्शन ड्रामा आहे. या चित्रपटाचे कथानक ‘रॉ’ एजंट हमजा (रणवीर सिंग) याच्या पाकिस्तानातील हेरगिरीवर केंद्रित आहे.
चित्रपटात पाकिस्तानातील अंडरवर्ल्ड, लष्करी सत्ता केंद्र आणि त्यांच्यातील साटेलोटे दाखविण्यात आले आहेत. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात प्रचंड हिंसा दाखविण्यात आली आहे. पहिल्या भागास मिळालेल्या यशानंतर दुसऱ्या भागात अधिक हिंसा, अधिक द्वेष, रिव्हेंज दाखवून निर्मात्याने कहर केला आहे. देशभक्ती समजू शकतो, परंतु या चित्रपटात देशभक्तीचा ओव्हरडोस झालेला दिसतो. पहिल्या भागाच्या यशानंतर काहीतरी नावीन्य अपेक्षित होते, परंतु निर्मात्याने चित्रपटात बरेच असत्य व खोटे दावे केले आहेत. कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून या चित्रपटाद्वारे जाणीवपूर्वक प्रपोगंडा करण्यात आला आहे. हा चित्रपट पाहिल्यावर देशभक्ती जागृत होण्याऐवजी अनेकांमध्ये द्वेष निर्माण होत आहे.
‘धुरंधर-२’ चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर पडल्यावर गेल्या आठवड्यात अकोला येथे अल्पवयीन मुलांनी प्रतिस्पर्धी गटावर प्राणघातक हल्ला केला. चित्रपटातील हिंसेचा, क्रोधाचा परिणाम दुसरे काय?
‘धुरंधर-२’ या चित्रपटातील रणवीर सिंगच्या मारधाड अॅक्शनमुळे त्याची भेदक नजर लक्ष वेधून घेणारी व शत्रूचे काळीज गोठवणारी आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागात कराचीच्या ल्यारीच्या रेहमान डकेतची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना भाव खाऊन जातो, तर ‘धुरंधर-2’ मध्ये रणवीर सिंग आपल्या थरारक स्टंटने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, परंतु या चित्रपटात अॅक्शनचा अंगावर काटा आणणारा अतिरेक झाला आहे. देशभक्तीच्या नावावर निर्मात्याने अत्यंत द्वेषमूलक व घृणास्पद अशी निर्मिती केली आहे.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधीक्षक अस्लम चौधरी याची संजय दत्तने ‘धुरंधर-२’ मध्ये भूमिका साकारली आहे. अस्लम चौधरी हा खाकी वर्दीतील माफिया होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते व त्याचे जेलमध्येही वास्तव्य होते. अशा या पाकिस्तानी अधिकाऱ्याची भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात येते, हे कथानक खरे असले तरी त्यात संजय दत्तचा अभिनय लाजवाब झाला आहे.
‘धुरंधर-२’ चित्रपटात दाऊद इब्राहिमी भूमिका तमीज इक्बालने साकारली आहे. इक्बालचे अभिनय कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. या चित्रपटात अंडरवर्ल्ड, अतिरेकी व सत्ताधाऱ्यांचे कनेक्शन दाखविण्यात आले आहे. दाऊद हा भारतीय गुप्तचरांना माहिती पुरवतो, नेपाळमार्गे भारतात कसा शिरकाव करतो, बनावट नोटा पाठवितो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
दाऊदला पाकिस्तानात ‘बडे साब’ म्हणून संबोधले जाते. भारतीय गुप्तचर यंत्रणा जेव्हा दाऊदच्या साथीदारांचे फोन इंटरसेप्ट करतात, तेव्हा त्यात ‘बडे साब’ असेच शब्द येतात, असे अनेकदा उघड झाले आहे. आपल्या गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानात जाऊन दाऊदचा शोध घेण्याचा, बॉम्बस्फोटात उडविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. ‘रॉ’सारख्या गुप्तचर यंत्रणांनी यासाठी छोटा राजन व त्याच्या साथीदारांची मदत घेतली, परंतु दाऊदपर्यंत कुणी पोहोचू शकले नाही.
भारतीय गुप्तचर संस्था खास करून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी 2004 साली पाकिस्तानात जाऊन दाऊदच्या जवळच्या लोकांना मारले. त्यानंतर रहमान डकेत, अशरफ पप्पू, अस्लम चौधरी, इलियास काश्मिरी आदी पाकिस्तानात मारले गेले. या साऱ्या २००४ पूर्वीच्या घटना आहेत. त्या वेळी मनमोहन सिंग हे हिंदुस्थानचे पंतप्रधान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेली बारा वर्षे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. 2019 मध्ये त्यांना दुसरा कार्यकाळ मिळाला.
आता दाऊदला आपल्या भारतीय केंद्रीय यंत्रणांकडून (‘हमजा’सारख्या धाडसी एजंटकडून) मारला जाईल का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दहशतवादावर बोलताना पाकिस्तानला नेहमी इशारा देतात, “घुसकर मारेंगे!” म्हणतात, पण कधी? अमेरिकेने पाकिस्तानात घुसून अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार मारले. मग भारताला दाऊदला मारणे अजून का शक्य होत नाही?






























































