
कोकण रेल्वे मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये विसरलेले तब्बल ५३ लाख ६ हजार रुपयांचे सामान प्रवाशांना परत केले आहे. तसेच तब्बल तीस हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांकडे सुखरूप पोहोचवले आहे.ऑपरेशन नन्हे फरीश्ते अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दिवसभरात 30 हून अधिक रेल्वेगाड्या धावतात. या गाड्यांमधील प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांवर असते. या धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि फलाटावर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालतात आणि लोकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी घेतात. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासी उतरताना आपले सामान अनेकवेळा विसरून जातात.
गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात अशा १४१ घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटनांमधून कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल ५३ लाख ६ हजार ७७६ रुपयांच्या मौल्यवन वस्तू प्रवाशांना परत मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. रेल्वे प्रवासात अनेक वेळा लहान मुले हरवतात किंवा विविध भागातून चुकून या मार्गावरील रेल्वेत चढतात. अशा तीस मुलांना त्यांच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे काम गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. यामध्ये २६ मुलं आणि ४ मुलींचा समावेश आहे. ऑपरेशन नन्हे फरीश्ते अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली आहे.
प्रवाशांची सुरक्षितता सांभाळताना प्रवासात चुकीचे वर्तन करून इतर प्रवाशांना त्रास देणाऱ्या व्यक्ती ही अनेक असतात. गेल्या वर्षभरात विनाकारण ट्रेनची चेन खेचून रेल्वे प्रवास विस्कळीत करणाऱ्या ७५ जणांवर कारवाई करत रेल्वे सुरक्षा बलाने ४ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गोव्यातून कोकण रेल्वेच्या माध्यमातून नेल्या जाणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर ही रेल्वे सुरक्षा बलाची नजर असते. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या ट्रेन्स मधून ३८ वेळा अवैध दारू पकडली गेली असून रेल्वे सुरक्षा बलाने ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बला कडून रेल्वे ॲक्ट अंतर्गत विविध ६४५ गुन्हे दाखल केले गेले असून ५ लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करताना दहा आरोपीना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



























































