घरगुती गॅसची 98 टक्के बुकिंग, कुठलीही टंचाई नसल्याची केंद्र सरकारची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील एलपीजी पुरवठ्याबाबत दिलासादायक माहिती दिली असून, कोणत्याही ठिकाणी गॅस टंचाई (ड्राय आऊट) झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी पुरवठा स्थिर असून मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

कालच देशभरात 51 लाखांहून अधिक एलपीजी रिफिल्स वितरित करण्यात आल्या. ऑनलाइन बुकिंगचा दर 98 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, ओटीपी-आधारित डिलिव्हरी 92 टक्क्यांपर्यंत झाली आहे. व्यावसायिक एलपीजी पुरवठाही सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पूर्ववत करण्यात आला असून, महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर (बल्क) पुरवठा सुरू आहे.

14 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 1 लाख टन एलपीजीचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये कालच 6,700 टन पुरवठा करण्यात आला असून, तो अंदाजे 3.5 लाख 19 किलोच्या सिलिंडर्सच्या समतुल्य आहे.

5 किलोच्या लहान सिलिंडर्सची उपलब्धता वाढवण्यात आली असून, 23 मार्चपासून आतापर्यंत 10 लाखांहून अधिक सिलिंडर्स विक्री झाले आहेत. काल एकट्यादिवशी 1.06 लाख सिलिंडर्सची विक्री झाली. याशिवाय, देशभरात 2,000 हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे 20,000 सिलिंडर्सचे वितरण करण्यात आले आहे.

खत उत्पादन प्रकल्पांसाठी नैसर्गिक वायूचा पुरवठा 95 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD) कंपन्यांकडून प्राधान्य क्षेत्रांना पूर्ण पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. आतापर्यंत सुमारे 3.97 लाख पीएनजी कनेक्शन सक्रिय करण्यात आले असून, 4.3 लाख ग्राहकांची नोंदणी झाली आहे. तसेच [http://mypngd.in](http://mypngd.in) या पोर्टलद्वारे 18,000 हून अधिक एलपीजी कनेक्शन स्वेच्छेने परत करण्यात आले आहेत.