
नियमांचे उल्लंघन करत निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात आलेले चांदीवली विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. चांदीवली विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम तपासण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असून या ईव्हीएमची लवकरच तपासणी केली जाणार आहे. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचे आढळल्यास लांडेंना आमदारकीला मुकावे लागणार आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदीवली मतदारसंघात भेट देऊन ‘रोड शो’ केला होता. हा प्रकार निवडणूक आचारसंहितेचे आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 126 चे उल्लंघन करणारा असून यामुळे मतदारांवर ‘अनुचित प्रभाव’ पडला, असा दावा करत काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद आरिफ ललन खान ऊर्फ नसीम खान यांनी हायकोर्टात आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सोमशेखर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. केवळ आरोप करणे पुरेसे नसून, त्यासाठी ठोस वस्तुस्थिती मांडणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने नसीम खान यांची याचिका फेटाळून लावली; मात्र ईव्हीएम मशीन दोन महिन्यांत तपासण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून लवकरच या ईव्हीएम मशीनची तपासणी केली जाणार आहे.
16 व 17 एप्रिलला तपासणी
‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू’ यांच्यामार्फत 16 आणि 17 एप्रिल रोजी चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी होणार आहे. भारत अन्न महामंडळ बोरीवली गोदाम क्र. 13 येथे ईव्हीएम व्हीपॅट मशीन बर्न मेमरी आणि मायक्रोपंट्रोलरची तपासणी होणार आहे.



























































