
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी दिल्लीतील संसद भवनात राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या शपथविधीसोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांना ही शपथ दिली. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्याने आगामी काही दिवसात नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेताच नितीश कुमार यांच्या नावावर एक वेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांचे सदस्यत्व भूषवणारे ते बिहारचे पाचवे नेते ठरले आहेत. त्यांच्यापूर्वी लालू प्रसाद यादव, उपेंद्र कुशवाहा, नागमणी आणि सुशील कुमार मोदी यांनी हा बहुमान मिळवला आहे.
#WATCH | Nitish Kumar takes oath as a Member of the Rajya Sabha.
(Video Source: Sansad TV/YouTube) pic.twitter.com/ZFbf761Wrm
— ANI (@ANI) April 10, 2026
दरम्यान, नितीश कुमार राज्यसभेवर गेल्याने आता ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. दिल्लीहून पाटण्याला परतल्यानंतर 14 एप्रिल रोजी ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राजीनाम्यापूर्वी विधिमंडळ दलाची बैठक होण्याची शक्यता असून त्यात नवीन नेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर 15 एप्रिल रोजी बिहारमध्ये नवीन सरकारचा शपथविधी होऊ शकतो. त्यामुळे बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून राडा; पोस्टर लागले, पोस्टर फाडले, वाचा सविस्तर…
नितीश कुमार यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रीय जनता दलाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आरजेडी नेते शक्ती सिंह यादव यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची दूरदृष्टी आणि भविष्यवाणी आज अक्षरशः खरी ठरली आहे. भाजपने रचलेल्या षडयंत्रामुळे नितीश कुमार यांचा राजकीय अध्याय आता संपला आहे. सत्तेच्या लालसेपोटी सुशासनाचा ढोंग करणाऱ्यांचा खेळ आता संपला असून जेडीयू रसातळाला गेली आहे, असा टोला शक्ती सिंह यादव यांनी लगावला.




























































