IPL 2026 – कोलकाताच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेणारा 21 वर्षीय मुकुल चौधरी कोण आहे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी सुपरहिट सामना झाला. लखनौ सुपर जायंट्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. लखनौचा खेळाडू मुकुल चौधरी याने तुफान फटकेबाजी करत संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळून दिला. शेवटच्या 4 षटकांमध्ये 54 धावांची गरज असताना आणि हातात फक्त 3 विकेट्स असतानाही मुकुल हा विजय मिळवून दिला.

मुकुलने अवघ्या 27 चेंडूत सात षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावांची खेळी केली. या मॅचविनिंग खेळीमुळे लखनौने कोलकातावर विजय मिळवला. गुरुवारी रात्रीपर्यंत ज्याला फारसे कोणी ओळखत नव्हते तो मुकुल शुक्रवारी सकाळी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. लखनौसाठी विजयाचे द्वार उघडणारा हा मुकुल चौधरी आहे तरी कोण?

मुकुल चौधरी 2025-26 च्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रकाशझोतात आला होता. या स्पर्धेत त्याने 57 च्या सरासरीने आणि जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने 173 धावा कुटल्या होत्या. त्याच्या या प्रतिभेमुळे आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेर लखनौने 2 कोटी 26 लाख रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात सामील केले.

मुकुल हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीप्रमाणेच कठीण प्रसंगात सामना जिंकून देण्याची क्षमता त्याने दाखवून दिली आहे. मुकुलने यष्टीरक्षण जाणीवपूर्वक निवडले नव्हते. राजस्थानमधील एका अकादमी सामन्यात संघात कोणीही यष्टीरक्षक नसल्यामुळे त्याने ही जबाबदारी स्वीकारली आणि आता तो एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.

IPL 2026 – तो मैदानात गोलंदाजांची कत्तल करतो… मुकुल चौधरीच्या ‘मॅचविनिंग’ खेळीनंतर अर्जुन तेंडुलकरचा व्हिडीओ व्हायरल

मुकुल मूळचा राजस्थानच्या झुंझुनू येथील आहे. क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जयपूरला गेला. तो ज्या अकादमीमध्ये खेळला त्याच अकादमीतून कार्तिक शर्मा आणि अशोक शर्मा यांसारखे स्टार खेळाडू पुढे आले आहेत. विशेष म्हणजे कार्तिक शर्मा जखमी झाल्यामुळेच मुकुलला सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. लखनौचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मुकुलचे वर्णन सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावरील सर्वात स्फोटक फलंदाज असे केले आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी आणखी वाढली असून आयपीएलच्या आगामी सामन्यांमध्येही त्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.