Iran Ceasefire – इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल, अटींची पूर्तता झाल्यास चर्चा पुढे जाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेसोबत शांतता चर्चेसाठी इराणचे एक शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल झाले आहे. इराणी माध्यमांनुसार, संसद अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव संपवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे राजनैतिक पाऊल मानले जात आहे. मात्र, इराणने हे स्पष्ट केले आहे की, वॉशिंग्टनने तेहरानच्या पूर्वअटी स्वीकारल्या तरच चर्चा पुढे जाईल. या शिष्टमंडळात इराणचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण परिषदेचे सचिव, सेंट्रल बँकेचे गव्हर्नर आणि संसदेच्या अनेक सदस्यांसह वरिष्ठ राजकीय, लष्करी आणि आर्थिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वाॅल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, तात्पुरती युद्धबंदी आणि दोन्ही बाजूंमधील अविश्वासाच्या वातावरणात पाकिस्तान या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करत आहे. दरम्यान, औपचारिक चर्चा सुरू होण्यापूर्वी काही अटींची पूर्तता झालीच पाहिजे, असा इराणने वारंवार आग्रह धरला आहे. यामध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक निर्बंधांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. यावरून असे दिसून येते की, चर्चेत सहभागी होऊनही इराणने स्वतःची भूमिका ही लावून धरली आहे.

लेबनॉन आणि इस्रायल यांनीही मंगळवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागात आपली पहिली बैठक घेण्यास सहमती दर्शवली आहे. या बैठकीत युद्धबंदीची घोषणा आणि औपचारिक चर्चेवर विचारविनिमय होणार असल्याचे समजते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, अमेरिका-इराण चर्चेचे आयोजन करणे ही केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगातील मुस्लिम समुदायासाठी अभिमानास्पद बाब आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी, पाकिस्तानच्या विनंतीवरून शस्त्रसंधी आणि शांतता चर्चेस सहमती दिल्याबद्दल इराण आणि अमेरिकेच्या नेतृत्वाचे आभार मानले. शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर, शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. डिझेलचे दर आता प्रति लिटर ५२० रुपयांवरून ३८५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, तर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर १२ रुपयांची कपात करण्यात आली आहे.