
भविष्य सांगून आणि भीती घालून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱया भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची डिजिटल कुंडली आता एसआयटीच्या हाती आली आहे.
विशेष तपास पथकाने ओकस प्रॉपर्टी या खरातच्या नाशिकमधील कार्यालय, कर्मयोगीनगर येथील बंगला, सिन्नरच्या मिरगावमधील शिवनिका ट्रस्ट येथील फार्म हाऊसमधून लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्डडिस्क हस्तगत केल्या आहेत. खरातसह त्याच्याशी संबंधितांचा मोबाईल डेटाही जमा करण्यात आला. या सर्व पुराव्यांचा फॉरेन्सिक अहवाल एसआयटीला मिळाला आहे. 32 जीबीचे 19 फोल्डर, तीन पेनड्राईव्हमधील 64 जीबीचा डेटा यासह अन्य डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात आली. आर्थिक व्यवहार, भोंदूगिरीतील पूजाविधी, लैंगिक शोषण या कृत्यांना एबीसीप्रमाणे विशिष्ट कोडवर्ड देण्यात आले आहेत.
प्रतिभा चाकणकरांना नोटीस
भोंदू खरात याचे व कुटुंबाचे समता पतसंस्थेत खाते आहे. शंभरहून अधिक खात्यांना तो नॉमिनी आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांचेही या पतसंस्थेत खाते आहे, त्यांच्या खात्यातून दोन कोटी चाळीस लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. खरातच्या सावकारीशी याचा संबंध असल्याचा संशय आहे. शिर्डी पोलिसात खरात व त्याच्या पत्नीविरुद्ध सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्याशी संबंधित तपासासाठी प्रतिभा चाकणकर यांना हजर राहण्याची नोटीस शिर्डी पोलिसांनी बजावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 33 खातेदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
खडेवाल्यांची चौकशी
भक्तांना भीती घालून त्यांच्यावरील अरिष्ट दूर करण्यासाठी भोंदू खरात हा अंगठय़ा व खडे देत होता. ते खरे रत्न असल्याचे व ते सिद्ध केल्याचे सांगून लाखोंची आर्थिक लूट करायचा. त्याला हे बनावट खडे पुरविणाऱयांची चौकशी एसआयटीने सुरू केली आहे.


























































