
तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता विजय याची मुख्य भूमिका असलेल्या आणि प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या ‘जन नायकन’ या राजकीय थरारपटाची (पॉलिटिकल थ्रिलर) ऑनलाइन लीक झाला. यावर आता सुपरस्टार रजनीकांत, कमल हासन आणि अभिनेता सूर्या यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या तिन्ही कलाकारांनी या घटनेबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्याची आणि पायरेसी रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना राबवण्याची आग्रही मागणी केली आहे.
एच. विनोद यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, विजय पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचा त्याचा शेवटचा चित्रपट ठरेल, अशी चर्चा सर्वत्र होती. शुक्रवारी हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यानंतर रजनीकांत यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियाचा आधार घेतला. तमिळ भाषेत लिहिलेल्या एका पोस्टमध्ये, हा चित्रपट लीक होणे ही अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचा प्रमुख थलपती विजय याच्यावर मोठे संकट कोसळले आहे. विजयचा चित्रपटसृष्टीतील शेवटचा चित्रपट मानला जाणारा ‘जन नायकन’ यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू असतानाच हा चित्रपट एचडीमध्ये लीक झाला आहे. पायरेडेट साईट्सवर या चित्रपटाचा काही भाग लीक झाल्याने चित्रपटसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केल्याचे विजयच्या टीमने म्हटले आहे.
चित्रपट लीक होण्यापूर्वी सोशल मीडियावर यातील टायटल क्रेडिट्स, विजयची एन्ट्री सीन आणि क्लायमॅक्सचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. सुरुवातीला निर्मात्यांनी तातडीने कारवाई करत हे व्हिडिओ हटवले, मात्र शुक्रवारी सकाळपर्यंत संपूर्ण चित्रपटच पायरेटेड साईट्सवर उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विकिपीडिया पेजवरही या लीक झालेल्या लिंकचा समावेश करण्यात आला होता. हा एक व्हायरस किंवा मालवेअर असू शकतो असा इशारा दिला जात आहे. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले होते.



























































