आंबेडकर जयंतीनिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष मध्यरात्री लोकल, BESTच्या अतिरिक्त बस सेवाही सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मध्य रेल्वेकडून मुख्य आणि हार्बर मार्गावर विशेष मध्यरात्रीच्या लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक मुंबईत दाखल होत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, सीएसएमटी–कल्याण आणि सीएसएमटी–पनवेल या मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत. सीएसएमटी–कल्याण विशेष लोकल रात्री 1.30 वाजता सीएसएमटीवरून सुटून 3.00 वाजता कल्याणला पोहोचेल. तसेच कल्याणहून रात्री 1.30 वाजता सुटणारी गाडी 3.00 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

हार्बर मार्गावरही सीएसएमटी–पनवेल विशेष लोकल रात्री 1.30 वाजता सीएसएमटीवरून सुटून 2.50 वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेलहून रात्री 1.30 वाजता सुटणारी गाडी 2.50 वाजता सीएसएमटी येथे दाखल होईल.

दरम्यान, रेल्वेसोबतच बेस्टनेही अतिरिक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दादर स्थानकातून शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीकडे जाण्यासाठी विशेष बस सेवा उपलब्ध असणार आहे. ही सेवा 14 एप्रिल रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, ज्यामुळे भाविकांना प्रवास सुलभ होणार आहे.

यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक चैत्यभूमी, दादर येथे येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. कोकण विभागातील सर्व शासकीय यंत्रणांना सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधा काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.