
मागील काही आठवड्यांपासून दिंडोशीतील टेकडी परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मालाड जलाशय टेकडी क्रमांक 1 व 2 मध्ये अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब लक्षात येताच शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने धडक देत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत ठोस निर्णय बैठकीत झाले.
महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्या कार्यालयात पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक पार पडली. मालाड जलाशयातील पाणी पातळी घटल्यामुळे उंच भागात दाबाने पाणी पोहोचत नाही. महाराष्ट्र नगर येथील प्रलंबित ऑनलाइन पंपिंग प्रकल्प व सहा इंच जलवाहिनीचे काम सुरू न झाल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. आप्पापाडा, क्रांतीनगर, पिंपरीपाडा, कोकणीपाडा, संतोषनगर व म्हाडा वसाहत या उंच भागांमध्ये पाणी टंचाई कायम असल्याचे आमदार प्रभू यांनी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. उदंचन पंपसाठी जागा दिलेल्या घरांची पात्रता लवकर निश्चित करून त्यांचे पुनर्वसन स्थानिक परिसरातच करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी नगरसेवक अंकित प्रभू, योगिता कदम, तुळशीराम शिंदे, सुहास वाडकर, शिवसेना पदाधिकारी प्रदीप निकम, रामचंद्र पवार, रमेश कळंबे आदी उपस्थित होते.
मालाड जलाशय टेकडी क्रमांक 1 मध्ये किमान 2 मीटर व टेकडी क्रमांक 2 मध्ये किमान 4 मीटर पाणी पातळी राखण्यासाठी तातडीने तांत्रिक अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जलवाटप प्रक्रिया, व्हॉल्व्ह ऑपरेशन, फ्लो मॅनेजमेंट व प्रेशर बॅलन्सिंग यामध्ये सुधारणा करून नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
- अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)


























































