
भाजपला ज्या प्रकारे मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे ते लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे, विरोधी पक्षाचे आमदार खासदार निवडूनच येऊ नयेत अशा प्रकारे त्यांना पुनर्रचना करायची आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
” 15 तारखेला विरोधी पक्षांची या संदर्भात बैठक होणार आहे. त्या बैठकीत चर्चा होईल. त्याआधी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करू. भाजपचं प्रत्येक पाऊल हे त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थाचं असतं. राजकीय दृष्ट्या ते प्रगल्भ नसतं. लोकशाहीच्या, देशाच्या फायद्याचं नसतं. आमचा फायदा कुठेय हे पाहून त्यांची धोरणं ठरत असतात. मतदारसंघाची पुनर्रचना ज्या प्रकारे करण्याचं भाजपच्या मनात आहे ते लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यांना अशाप्रकारे मतदारसंघ फोडायचे आहेत की विरोधी पक्षाचे आमदार खासदार निवडूनच येऊ नयेत. निवडणूक आयोग हा भाजपच्या ताटाखालचं मांजर झालाय. त्याच्या मदतीने भाजप अंदाधुंद पद्धतीने मतदारसंघ तोडणार फोडणार. विरोधी पक्ष राहताच कामा नये किंवा आम्ही सांगू तेच राहतील असे त्यांचे मतदारसंघाचे डॉक्युमेंट्स तयार झाले आहेत. पण आम्ही ते होऊ देणार नाही. या संदर्भात सर्वपक्षीय चर्चा झाली पाहिजे, समिती नेमली गेली पाहिजे. भाजप व त्याच्या मित्रपक्षांच्या सोयीसाठी मतदारसंघ फुटले जाणार नाहीत. माझे मतदारसंघ माझ्या माझ्या पद्धतीने तयार करून घेईल असे होणार नाही”, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
”महिला आरक्षणावरून जे राजकारण सुरू आहे ते एकतर्फी आहे. मोदीजींना वाटतेय की महिला आऱक्षणाचे ते मसीहा आहेत. तर तसं नाहीये. सर्वात आधी महाराष्ट्रात शरद पवार यांनी महिला आरक्षण सुरू केले”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

























































