
देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. देवरुखकडून संगमेश्वरच्या दिशेने येणाऱ्या एलपी वाहनाच्या चालकाने वळणावर आपले वाहन थेट रस्त्याच्या मधोमध आणल्याने समोरून येणाऱ्या ट्रकशी त्याची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रक थेट रस्त्याखालील दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चालक आणि व एलपी चालक दोघंही गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एलपी वाहन देवरुखमार्गे संगमेश्वरला येत होते. याच वेळी चिपळूणहून बॉक्साईट भरून आंबाघाटाच्या दिशेने जाणारा ट्रक समोरून आला. लोवले येथील वळणावर एलपी वाहन चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गाडी रस्त्याच्या मधोमध घातली. समोरून येणाऱ्या ट्रक चालकाला बाजू मिळणे अशक्य झाल्याने दोन्ही वाहनांची समोरा समोर धडक झाली. धडकेनंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बॉक्साईटसह हा ट्रक पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला.
अपघाताची भीषणता पाहून उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. एलपी वाहनाच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालक बालाजी जलबा कोंडेवार (रा. नांदेड) हा केबिनमध्येच अडकून पडला होता. या अपघातात बालाजी कोंडेवार आणि ट्रक चालक मोहम्मद युसूफ शफी शेख हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून युद्धपातळीवर अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून मार्ग मोकळा केला.

























































