
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, यामध्ये सत्ताधारी पक्षातील काही नेते आणि मंत्र्यांचीही नावे समोर येऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी उघड होण्याआधीच खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
खरात प्रकरणात अनेक प्रभावशाली लोकांची नावे समोर येण्याची शक्यता असून, ती बाहेर येण्यापूर्वीच त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सोलापूर जिह्यातील जमिनींच्या प्रकरणात सरकारमधील काही मंत्री, अधिकारी आणि खरात यांच्यात संगनमत असण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे पुरावे बाहेर येऊ शकतात. मात्र, परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीती प्रणिती शिंदे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.
महिलांचे शोषण हा गंभीर विषय
एकीकडे आपण महिला आरक्षणाच्या विषयावर बोलतो; पण दुसरीकडे नाशिकमध्ये महिलांचे शोषण होत असेल, तर ते गंभीर आहे. महिलांच्या विरोधातील विचारच तुमच्या डोक्यात असतील, तर तुम्ही आरक्षण कसे लागू करणार, असा सवालही प्रणिती शिंदे यांनी केला.




























































